नवी दिल्ली
कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व २३ आरोपींची कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात कोणताही ठोस पुरावा किंवा गुन्हेगारी कट नसल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने सीबीआयचा तपासाचा सिद्धांत पूर्णपणे फेटाळून लावला आहे. या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल भावूक झाले होते. त्यांनी अत्यंत भावूक होत आपण कधीही भ्रष्ट नव्हतो आणि आयुष्यभर फक्त प्रामाणिकपणाची कमाई केल्याचे सांगितले. हे स्वतंत्र भारतातील सर्वात मोठे राजकीय षड्यंत्र होते मात्र शेवटी सत्याचाच विजय झाला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, मनीष सिसोदिया यांनीही केजरीवालांना साथ देत हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे 'आप'च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सोशल मीडियावर 'सत्याचा विजय' अशा घोषणा दिल्या जात आहेत. सीबीआयने या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याचे ठरवले असले, तरी सध्याच्या स्थितीत हा आम आदमी पार्टीसाठी मोठा नैतिक आणि राजकीय विजय मानला जात आहे.

0 टिप्पण्या