जळगाव
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा गावात प्रेमप्रकरणातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेची तिच्या कथित प्रियकराने घरात घुसून गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत जीवन संपवले. अनिता (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असून ती आपल्या पती आणि दोन मुलांसह गावात राहत होती. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अनिता यांची मुलगी शाळेतून घरी आली असता, तिला तिची आई आणि एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले.
प्राथमिक माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील भीमा ऊर्फ देवा धनगर या तरुणाने अनिता यांच्या घरात शिरून देशी कट्ट्याने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःच्या कानशिलावर गोळी झाडून आत्महत्या केली. या दोघांची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती, असे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि पोलीस निरीक्षक मधुकर साल्वे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमनेही पुराव्यांची तपासणी केली असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हा प्रकार प्रेमसंबंधातून घडल्याचे दिसत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या