अकोला
अकोला जिल्ह्याच्या पोलीस दलाला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ८० लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होऊन लॉकअपमध्ये असलेल्या एका महिलेकडे, ५४ वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) राजेश जाधव याने अत्यंत अश्लील आणि अमानवीय मागणी केली. "तू खूप सुंदर आहेस, तुझी मुलगीही तुझ्यासारखीच सुंदर असेल, तिला माझ्याकडे पाठव," असे म्हणून त्याने या पीडित महिलेला १० हजार रुपयांचे आमिष दाखवले. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आरोपी एएसआयवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला अकोला शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत होती. मंगळवारी ड्युटीवर असलेल्या राजेश जाधव याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून महिलेशी गैरवर्तन केले. पीडित महिलेने हा सर्व प्रकार तिथल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितल्यानंतर ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर गेली. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांदक यांनी आरोपी एएसआय राजेश जाधव याला तात्काळ निलंबित केले आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेच्या भीतीने आरोपी सध्या फरार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपीला झापल्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

0 टिप्पण्या