अहमदनगर

मुलींना आईवडील सांभाळण्याचा अधिकार दिला असता तर कोणाचेच वृद्धाश्रमांत गेले नसते - कथाकार प्रकाश महाराज साठे


बोधेगाव प्रतिनिधी

“प्रत्येक मुलीला आई-वडिलांची जबाबदारी सांभाळण्याचा समान अधिकार दिला गेला असता तर समाजातील कोणाचेच आई-वडिलांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. तसेच सुनेने सासू-सासऱ्यांची मनापासून सेवा केली, तर वृद्धाश्रम ही संकल्पनाच उरणार नाही,” असे प्रभावी प्रतिपादन कथाकार प्रकाश महाराज साठे यांनी केले.



पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे संत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेल्या ९२ व्या फिरत्या नारळी सप्ताहा  महंत डॉ नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून निमित्त आयोजित कथेच्या कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी परिसरातील विविध गावांमधून आलेल्या भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रकाश महाराज साठे यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी वाणीतून कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, बदलत्या जीवनशैलीमुळे कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. आई-वडिलांची सेवा ही केवळ मुलांचीच जबाबदारी आहे, असा गैरसमज समाजात निर्माण झाला आहे; मात्र मुलींनाही तेवढ्याच हक्काने व प्रेमाने ही जबाबदारी पार पाडता येते. योग्य संधी आणि पाठबळ दिल्यास मुली अधिक जिव्हाळ्याने आई-वडिलांची सेवा करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.



स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नावर त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. “स्त्रीभ्रूण हत्या ही समाजासाठी घातक प्रवृत्ती असून ती तात्काळ थांबवली पाहिजे. मुलगी हीच कुटुंबाचा खरा आधार ठरू शकते. कन्यादानाच्या रूपाने ती वडिलांचे ऋण फेडते. त्यामुळे मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान संधी, शिक्षण आणि सन्मान दिला पाहिजे,” असे ते म्हणाले.

तसेच कुटुंबातील सून-सासू-सासरे यांच्यातील नातेसंबंधांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सून जर सासू-सासऱ्यांची सेवा आपल्या आई-वडिलांप्रमाणे करत असेल, तर घरात प्रेम, आपुलकी आणि समाधान नांदते. अशा सुदृढ कुटुंबव्यवस्थेमुळे वृद्धाश्रमांची गरज भासत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी संत भगवान बाबांच्या शिकवणीचा संदर्भ देत समाजात सदाचार, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव जोपासण्याचे आवाहन केले. सप्ताहाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून महिला भाविकांचा मोठा सहभाग विशेष लक्षणीय ठरला जात आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बडेवाडी ग्रामस्थ अतिशय परिश्रम घेत आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या